सोलापूर – विवाहिता सना माजिद खान (वय २५, रा. सोलापूर) हिला माहेराहून पाच लाख रुपये व्यापारासाठी आणण्याची मागणी करुन त्याकरिता तिला नवी मुंबई व सोलापूर येथे शिवीगाळ व धमक्या देत मारहाण करुन तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपी पती माजिद अ. रऊफ खान (वय ३२), सासरे अब्दुल रऊफ खान (वय ६१), सासू हुसेनबानू अ. रऊफ खान (वय ५९ वर्षे) आणि दीर इमाम अ. रऊफ खान (वय ३४, सर्व रा. नवी मुंबई) या चौघांची मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष मुक्तता केली. यात हकीगत अशी की, दि. २३ सप्टेंबर २०१२ रोजी लग्न झाल्यानंतर पती माजिद खान याने पत्नी सना खान हिला नवी मुंबई येथे नांदण्यास नेले.
परंतु काही दिवसांत वरील चार आरोपींनी फिर्यादी सना खान हिला व्यापारासाठी माहेराहून पाच लाख रूपये आणण्याची मागणी केली. ती रक्कम न आणल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला माहेरी पाठवून दिले. विवाहितेचा चुलत भाऊ अझर पठाण याचे घरी तडजोड करुन आरोपींनी सना खान हिला नांदण्यासाठी नवी मुंबई येथे नेले. सहा साक्षीदार तपासण्यात आले.
परंतु पुन्हा तिला आरोपींनी पैशांच्या कारणावरुन शिवीगाळ व धम क्या देत मारहाण करून हाकलून दिले. त्यानंतरही सना खान माहेरी सोलापूर येथे असतानाही तिला आरोपी माजिद खान याने ५ जानेवारी २०१४, ६ एप्रिल २०१४ एप्रिल २०१४ रोजी आणि १३ सोलापूर येथे येऊन वेळोवेळी मारहाण केली व धमकी दिली वगैरे आशयाची फिर्याद विवाहिता सना खान हिने सदर बझार पोलिस ठाण्यात दि. २३ एप्रिल २०१४ रोजी आरोपींविरुद्ध दिली होती. गुन्ह्याचा तपास महिला सहाय्यक पोलिस निरिक्षक सीमा सुर्वे यांनी केला.
सदर प्रकरणात आरोपींचे वकील अंदोरे यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून केवळ मुलाचा ताबा मिळवण्याकरिता आरोपींना खोट्या गुन्ह्यात गुंतविले असल्याचा युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्रा मानून न्यायाधिशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. अमर डोके यांनी तर सर्व आरोपींतर्फे अॅड. अरविंद अंदोरे, अॅड. आल्हाद अंदोरे व अॅड. अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले.