छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सत्ताधा-यांना चांगलेच कोंडीत पकडले होते. मात्र केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी राहुल यांना हिंदू विरोधी म्हणून त्यांची जात विचारल्याने यामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरूवारी गांधी भवन येथे ठाकुर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जातीयवादी मंत्री ठाकुर यांच्या राजीनाम्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.
भारतीय संविधानानुसार आपण सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्ष तत्वानुसार चालतो व वागतो. सर्वांसाठी ते अनिवार्य केले आहे. मात्र भर संसदेत मंत्री ठाकुर विरोधी पक्षनेते राहुल यांची जात विचारत आहेत. हे निंदनीय आहे. याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन त्यांना माफी मागायला लावायला पाहिजे होती. मात्र त्यांनी ठाकुर यांना पाठिंबा देऊन त्यांच्या जातीय वक्तव्याला पाठिंबा दिला. यामुळे संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखवल्या आहेत.
पवित्र लोकशाहीच्या संविधानाचे अवमुल्यन असून याच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहागंज येथील गांधी भवन समोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. ठाकुर यांची प्रतिमा असलेल्या पोस्टर्सवर फूल मारून व जोडे मारून निषेध नोंदवला. तसेच मोदी सरकार मुदार्बादच्या घोषणा देऊन रोष व्यक्त केला.