पंढरपूर : दिल्लीत या महिन्यामध्ये मोठी राजकीय उलाढाल होत असून त्यामुळे मी येऊ शकत नाही, असा फोन शरद पवार यांनी केल्याचे सांगत शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला . शेतकरी कामगार पक्षाच्या १९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला आज पंढरपूर येथे सुरुवात झाली, यावेळी उद्घाटन प्रसंगी भाई जयंत पाटील बोलत होते. या राष्ट्रीय अधिवेशनाला शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते.
मात्र त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा सुरु असताना भाई जयंत पाटील यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी फोन करून दिल्लीत मोठी राजकीय घडामोड सुरू असून या महिन्यात ती होणार असल्याने आपण कार्यक्रमास येऊ शकत नसल्याचे पवार यांनी सांगितल्याचा हवाला भाई जयंत पाटील यांनी दिला. आपण दिल्लीत सरकार पाडा मग या, आम्ही तुमचे स्वागत करू अशा शुभेच्छा आपण त्यांना दिल्याचेही भाई जयंत पाटील यांनी सांगितले. या अधिवेशनास माकपचे दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह शेकापचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भाई जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांनी मला फोन केला. ते म्हणाले की, माफ करा मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही. मी दिल्लीला आहे. एका महिन्यात मोठी राजकीय उलाढाल होत आहे. त्यामुळे मला जमणार नाही. मी बोललो तुम्ही सरकार पाडा आणि या, आम्ही तुमचे स्वागत करू. या अगोदर जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यांतच बदलणार आहे. त्यानंतर दिल्ली सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शरद पवार यांच्या हवाल्याने नव्याने वक्तव्य केल्याने भुवया उंचावल्या आहेत.