सोलापूर : रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. असे चित्र सोलापूर शहरातील सर्वच चौकात सर्रासपणे दिसून येत आहे. सोलापूरच्या प्रवेशद्वारापासूनच शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याचे चित्र दिसून येते. शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्या ही निर्माण होत आहे. शिवाय भर रस्त्यात अनेकदा या जनावरांची आपसातल्या भांडणांमुळे छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना दुखापत अन् वाहनांचे नुकसान होत आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर जनावरे सर्रासपणे वावरताना दिसताहेत. त्यामुळे वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन चौक, सात रस्ता परिसर, गुरुनानक चौक, टिळक चौक, मधला मारुती, सम्राट चौक, रूपाभवानी रोड, मार्केट यार्ड परिसर, परिसर, अशोक चौक, विजापूर वेस, आसरा चौक, सैफुल, दमाणी नगर, लक्ष्मी मंडई परिसर आदी चौकात मोकाट जनावरे सर्रासपणे दिसून येतात. शहरात सध्या मोकाट जनावरांसोबतच मोकाट कुत्रे, गाढवांचाही वावर वाढला आहे. या जनावरांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर आहे, आठ ते दहा ठिकाणी ही जनावरे रस्त्यातच ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहनधारकांना आपली वाहने चालविताना दुचाकीस्वारांना तर कधी चुकवत तर कधी वळसा मारूनच जावे लागते. बऱ्याच वेळा अशा मोकाट जनावरांमुळे वाहतूक विस्कळीत, ठप्प झाल्याचे तसेच अपघात झाल्याचे दिसून येते.