परभणी : शहरातील संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पहिल्या श्रावण सोमवारी होणा-या या कावड यात्रोत्सवात परभणी शहरातून व विविध भागातून शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर कावड यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आनंद भरोसे व संजीवनी मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
श्रावण महिन्यातील मानाची पवित्र महाकावड यात्रा निघणार आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ५ ऑगस्ट सोमवार रोजी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता श्रीक्षेत्र त्रिधारा येथील त्रिवेणी संगम असलेल्या नदीपात्राचे विधीवत पूजन करून सर्व भाविक नदीवर कावड भरण्यासाठी रवाना होतील. श्रीक्षेत्र त्रिधारा येथून कावडयात्रेची शोभायात्रा सकाळी ८.३० वाजता नदीवरून कावड भरून सर्व भाविक निघतील व दुपारपर्यंत परभणी शहरात दाखल होतील.
विविध पथकासह शिवभक्त भक्तीमय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नारायण चाळ, गांधी पार्क ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे कावडयात्रेची शोभायात्रा मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिराजवळ सायंकाळी दाखल होईल. तेथे भारतातील सर्वात मोठे मृत्युंजय पारदेश्वर शिवलिंगाचा अभिषेक करून समारोप होईल.