परभणी : बँकेच्या कामासाठी जमिनीचा फेरफार करून सातबारावर नोंद घेण्यासाठी ८० हजारांची मागणी करून पाहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये लाच स्विकारताना फुलकळस सज्जा तलाठी दत्ता संतराम होणमाने(४७) यास गुरूवारी रंगेहाथ पकडण्यात आले होते. तलाठी होणमाने यास दि. २ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असताना न्यायालयाने १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.
त्यानंतर पोलिसांनी पुन्हा तलाठी होणमाने यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ ऑगस्टपर्यंत तलाठी होणमाने यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तलाठी होणमाने याने तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे फुलकळस शिवारातील २ गुंठे जमिनीचा फेरफार करून सातबारावर नोंद घेण्यासाठी प्रति गुंठा ४० हजार रुपये याप्रमाणे ८० हजार रुपयाची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दि. २९ जुलै रोजी एसीबी परभणी येथे त्याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर गुरुवारी पंचासमक्ष तलाठी होणमाने यास एसीबी पथकाने ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.