22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रअवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी शेतक-यांना ५९६ कोटींची मदत

अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी शेतक-यांना ५९६ कोटींची मदत

मुंबई (प्रतिनिधी) : जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यांत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी शेतक-यांना ५९६ कोटी २१ लाख रुपये मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, या करीता शेतक-यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींसाठीदेखील मदत देण्यात येते. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण आणि आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणा-या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. अवेळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्यात येते. त्या अंतर्गत या निधी वाटपास मंजुरी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

जानेवारी ते मे, २०२४ या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांसाठी जानेवारी ते मे, २०२४ या कालावधीत शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानी करता १०८ कोटी २१ लाख रुपये, पुणे विभागातील सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी ५ कोटी ८३ लाख रुपये, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांतील नुकसानासाठी ३८२ कोटी १२ लाख रुपये, नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांतील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी १०० कोटी ४ लाख रुपये असे एकूण ५९६ कोटी २१ लाख ९५ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. ही मदत थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या बाबतचा महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय २ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR