मुंबई : कोरोना काळात मुंबईतील ऑक्सिजन जनरेशन प्लांट घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे शाखेने आज मोठी कारवाई केली. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रमुख रोमिन छेडा याला आज अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने रोमिन छेडा याची गुरुवारी (२३ नोव्हेंबर २०२३) सलग आठ तास चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली. रोमिन छेडा याचे संबंध शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.
आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी रात्री नागपाडा पोलिस ठाण्यात त्याचा विरोधात गुन्हा दाखल केला होता. रोमिन छेडा हे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक असून या कंपनीला कोविड काळात ऑक्सिजन प्लांट संबंधित कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. या सर्व प्रकरणात गैरप्रकार आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी करत गुन्हा दाखल केला. आज पुन्हा चौकशी करण्यात आल्यानंतर रोमिनला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
अनेक प्लँटचे कंत्राट
मुंबई पोलिसांनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बीडीबीए रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयात ३० दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट रोमिन छेडा यांच्याशी संबंधित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. यात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.