उत्तरकाशी : वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही. गेल्या १२ दिवसांपासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पण बचावकार्य पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. कारण खोदकाम करणा-या ऑगर मशिनमध्ये बिघाड झाला होता. यामुळे खोदकाम जागेवरच थांबलेले आहे.
गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आता बचावकार्यावेळी बोगद्याच्या आतमध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. जेणेकरून बोगद्याच्या आतमध्ये बचाव कार्यादरम्यान कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, याचा आधीच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी सतत चर्चा करण्यात येत असून त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत, असे सांगण्यात आले. दरम्यान, मशीन खराब झाल्यानंतर देश-विदेशातून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, बचावकार्य अंतिम टप्प्यात आले आहे.