पॅरिस : अनुभवी खेळाडू मनिका बत्राच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिला टेबल टेनिस संघाने इतिहास रचला. भारतीयटेबल टेनिस संघ प्रथमच ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. राउंड ऑफ १६ च्या सामन्यात भारताने रोमानियाचा ३-२ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना अमेरिका किंवा जर्मनीशी होईल. निर्णायक लढतीत मनिका बत्राने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारताने पहिल्यावहिल्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली.
भारतासाठी श्रीजा अकुला आणि अर्चना गिरीश कामत या जोडीने दुहेरीचा सामना जिंकून आघाडी घेतली, त्यानंतर मनिकाने आपला एकेरी सामना जिंकून २-० अशी आघाडी घेतली. मात्र, श्रीजा अकुला आणि अर्चना गिरीश कामत यांनी आपापले एकेरीचे सामने गमावले. त्यामुळे रोमानियाने २-२ अशी बरोबरी साधली होती. निर्णायक सामना खेळण्यासाठी मनिका बत्रा कोर्टवर आली. मनिका बत्राने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत प्रतिस्पर्ध्याच्या ११-५, ११-९ आणि ११-९ असा पराभव करत भारतासाठी इतिहास रचला.
श्रीजा अकुला आणि अर्चना कामथ यांनी दुहेरीच्या सामन्यात एडिना डायकोनू आणि एलिझाबेथ समारा यांच्यावर ११-९, १२-१०, ११-७ असा विजय नोंदवला होता. मनिकाने तिच्या एकेरीच्या सामन्यात बर्नाडेट झॉक्सचा ११-५, ११-७, ११-७ असा पराभव केला होता. नंतर भारताला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. अखेर भारताकडून मनिकाने अनुभवाचा वापर करत संघाचे आव्हान जिवंत ठेवले.