छत्रपती संभाजीनगर : शहर परिसरात तीन प्रकारच्या खाद्यतेलांत किरकोळ दरवाढ झाली आहे. नवीन शेंगदाणा तेल अद्याप बाजारात उपलब्ध झाले नसल्याने शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. पुढील महिन्यापर्यंत नवीन आवक सुरू होऊन शेंगदाणा तेलाचे दर कमी होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदाच्या अपु-या व अवेळी झालेल्या पावसाचा कमी-अधिक फटका खाद्यतेल उत्पादनावर झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून नवीन शेंगदाणा तेल बाजारात येण्यास किमान महिन्याभराचा उशीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोयाबीन रिफाईंड, सूर्यफूल तसेच सरकी रिफाईंड तेलाचे दर लिटरमागे १०० रुपयांवरून १०५ रुपयांपर्यंत गेले आहेत; म्हणजेच या तीन प्रकारच्या खाद्यतेलांत लिटरमागे पाच रुपयांनी दरवाढ झाली आहे.
करडी, शेंगदाणा भाव कायम
करडी तसेच शेंगदाणा तेलाचे दर १८० ते १८५ रुपयांवर कायम आहेत. दरम्यान, नवीन शेंगदाणा तेलाची आवक सुरू झाल्यावर या तेलाचे दर लिटरमागे किमान १० ते २० रुपयांनी घटू शकतात, अशीही शक्यता खाद्यतेलाचे व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी व्यक्त केली आहे.