परभणी : शहरातील गांधी विद्यालयाचा विद्यार्थी कुणाल मोतीराम चव्हाण यांची जिल्हाधिकारी म्हणून ओरीसा येथे नियुक्ती झाली आहे. आपल्या शाळेचा विद्यार्थी जिल्हाधिकारी पदावर नियुक्त झाल्याने गांधी विद्यालय एकता नगर येथे दि. ६ ऑगस्ट रोजी माजी विद्यार्थी कुणाल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. एन. लाडके तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव दिपकरराव खिस्ते, संचालक डॉ. प्रभाकरराव गमे, रमाकांतराव लाडके, प्रभाकरराव बोराडे, मुकुंदराव खिस्ते, पि. के. केंद्रेकर, जी. एन.अरमाळ, बि. डी. लाडके होते. मुख्याध्यापक बि. डी. आयनिले, उपमुख्याध्यापक पि.आर. नरवाडे, आर. आर. जाधव, ज्ञानेश्वर नखाते, पि. आर. जाधव, रेखा पाचपिल्ले यांची उपस्थिती होती.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत असताना कुणालच्या गुणवत्ते बाबत शिक्षकांना त्याचे कौतुक वाटत होते. शिस्त, अभ्यासात सातत्य, विनम्रता आणि आत्मविश्वास यांच्या बळावर स्पर्धा परीक्षेत कुणालने यश मिळवले असल्याचे भाषणात मान्यवरांनी सांगितले. शाळेचा एक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी होत असल्याने संस्थेला व शाळेला सार्थ अभिमान वाटतो अशाही भावना व्यक्त करण्यात आल्या.
जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालेले कुणाल चव्हाण व त्यांचे आई वडील यांचा शाळेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कुणाल म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून जीव लावून त्याचा सतत पाठपुरावा केला तर निश्चितच यश मिळते. सुत्रसंचालन बबन आव्हाड यांनी तर आभार श्वेता जोशी यांनी मानले.कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.