नवी दिल्ली : इंद्रायणी नदी पात्रालगतची जाधववाडी चिखली येथील अनधिकृत २९ बंगले कायमचे जमीन दोस्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे महापालिकेकडून कारवाई केव्हा होणार? याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या बंगल्यांसह परिसरातही बांधकामे आणि काही बंगल्यामध्ये अंतर्गत कामे सुरू असल्याचे बुधवारी आढळले.
पिंपरी चिंचवड शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी वाहते. तिच्या पूररेषेत प्लॉटिंग करून जागेची विक्री केली आहे. त्यावर लाखो रुपये खर्चून नागरिकांनी बंगले बांधले आहेत. तीन-चार मजली घरे सुद्धा आहेत. याबाबत पर्यावरण प्रेमी वकील तानाजी गंभीरे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. लवादाने सर्व बंगले पाडण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाच्या विरोधात संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने हरित लवादाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे महापालिका काय भूमिका घेते, याकडे लक्ष आहे.