सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय मंडळावर नियुक्तीसाठी आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रत्येकी दोन नावे पणन विभागाकडे पाठविली आहेत. त्यामुळे अशासकीय प्रशासक मंडळाचा तिढा सुटेनासा झाला आहे.
बाजार समितीवर मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. शिंदे गटाच्या दोन जिल्हा प्रमुखांची अशासकीय मंडळावर नियुक्ती झाली. भाजपचे आ. विजयकुमार देशमुख यांनी अशासकीय मंडळावर नियुक्तीसाठी विक्रम देशमुख, किरण देशमुख, शिवानंद पाटील यांची नावे पणन विभागाला पाठवली आहेत. मात्र, यास अजित पवार गटाचे नेते डॉ. बसवराज बगले यांनी विरोध केल्यामुळे त्यांची नियुक्ती रखडली आहे. त्यातच आता आ. कल्याणशेट्टी, आ. देशमुख यांनी प्रत्येकी दोन नावे पणन विभागाला पाठविल्यामुळे पणन विभागाची अडचण झाली आहे.
दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे बाजार समितीवर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आणि एक प्रशासक असे एकूण सात जणांचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, भाजपच्या कोट्यातून सात नावे गेल्याने नेमके कुणाचे नाव वगळण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी राजशेखर शिवदारे, औराद येथील संदीप टेळे, आ. कल्याणशेट्टी यांनी शिवानंद पाटील, कुंभारी येथील गजानन होनराव यांची नावे पाठविली आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बसवराज बगले यांचे नाव आहे, तर आ. यशवंत माने यांच्याकडून एका नावाची शिफारस होणार आहे.