झरी : युवकांना व्यायाम करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून नाम फाउंडेशन व ग्रामपंचायतच्या वतीने व्यायाम शाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतू पुरेशी देखभाल अभावी व्यायाम शाळेत घाणीचे साम्राज्य झाले पसरले आहे. सुरक्षेअभावी या ठिकाणचे साहित्य देखील गहाळ होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. व्यायाम शाळेच्या साहित्याची मोडतोड झाली असून प्रचंड दुरवस्था होत चालली आहे. त्यामुळे ही व्यायाम शाळा असून अडचण नसून खोळंबा ठरली आहे.
तत्कालीन सरपंच कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांच्या प्रयत्नाने व तत्कालीन बांधकाम सभापती गंगाताई देशमुख यांच्या पाठपुराव्याने २००३ साली तत्कालीन शिवसेना नेते आ. दिवाकरराव रावते यांच्या स्थानिक विकास निधीतून व्यायाम शाळेसाठी निधी उपलब्ध केला होता. झरी येथील मारुती मंदिराच्या बाजूला सुसज्ज अशी बजरंग व्यायाम शाळेची इमारत उभी केली होती. युवकांना व्यायामाचे लागणारे संपूर्ण साहित्य उपलब्ध करून दिले होते.
त्यानंतर १३ वर्षांनी तत्कालीन सरपंच अश्विनी देशमुख यांच्या कार्यकाळात कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांनी नाम फाउंडेशनच्या वतीने अद्यायावत नवीन पद्धतीचे युवकांना सहज व्यायाम करता येईल अशी लाखो रुपयाचे साहित्य उपलब्ध करून दिले होते. मात्र ग्रामपंचायतने व्यायामशाळेकडे ढुंकूनही पाहत नसल्याने व्यायाम शाळेमध्ये सगळीकडे भिंतीवर थूककलेले, कचरा व घाण आहे. या शाळेला कुलूप नसल्याने कुत्रे, प्राणी व्यायाम शाळेत जावून बसत आहेत. ग्रामपंचायतने यावर तात्काळ उपयोजना करण्याची गरज आहे. व्यायाम शाळेतील साहित्य धूळ खात पडल्याने तरूण युवकांना व्यायाम करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
नागरिकांना व्यायामासाठी दहा प्रकारची साधने व्यायाम शाळेत बसवलेली होती. ग्रामपंचायत गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे व्यायाम शाळेतील साहित्य गहाळ होत असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी महाकाल मित्रपरिवारचे प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.