25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीची १६ ऑगस्टला संयुक्त सभा

महाविकास आघाडीची १६ ऑगस्टला संयुक्त सभा

महायुती-महाविकासआघाडी फोडणार प्रचाराचा नारळ

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही तयारीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून लवकरच राज्यभर सभा-बैठका घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र लढणार आहे. महाविकासआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा देखील लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर करणार की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री होणार हा फॉर्म्युला वापरणार हे निवडणुकीच्या आधी ठरविले जाऊ शकते.

मविआ आणि युतीच्या नेत्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून ते राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. महाविकास आघाडी १६ ऑगस्ट ला प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती २० ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईमध्ये १६ ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याच सभेतून महाविकास आघाडी विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरीवरून शुक्रवार (९ ऑगस्ट)पासून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली तर आजपासून काँग्रेस पक्षाचे नेते मराठवाड्याच्या दौ-यावर असणार आहेत.

२० ऑगस्टपासून महायुतीची संवाद यात्रा
८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. २० ऑगस्टला कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महायुती संवाद यात्रेला सुरुवात करणार आहे. २८८ मतदार संघांमध्ये ही संवाद यात्रा होणार आहे. कोल्हापूरमध्ये सुरुवात केलेल्या संवाद यात्रेची सांगता मुंबईमध्ये होणार आहे.एका दिवसाला दोन किंवा तीन मतदारसंघांमध्ये ही संवाद यात्रा होईल. राज्याच्या सातही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

अमित शहा महाराष्ट्र दौ-यावर
येणा-या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ३ दिवस महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौ-याला महत्त्व आले आहे. १६, १७ आणि १८ ऑगस्ट रोजी अमित शहा हे महाराष्ट्र दौ-यावर असतील. या दरम्यान ते ६ विभागांत भाजपच्या पदाधिका-यांशी विभागवार चर्चा करणार आहेत.

आजपासून काँग्रेस नेते दौ-यावर
आजपासून काँग्रेस नेत्यांचा मराठवाडा आणि विदर्भ दौरा सुरू होणार आहे. तर १६ ऑगस्टला महाविकासआघाडीच्या प्रमुख पदाधिका-यांचा मुंबईत मेळावा होणार आहे. २० ऑगस्टला महाविकासआघाडीचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे. २० तारखेच्या या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहणार आहेत. १० आणि ११ ऑगस्टला काँग्रेस नेते लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, हिंगोलीत दौरा करणार आहेत. १२ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. १३ तारखेला बुलडाणा, अकोला आणि वाशिममध्ये संवाद साधणार आहेत. १४ ऑगस्टला काँग्रेस नेते अमरावती आणि यवतमाळमध्ये असतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR