लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्त्तीची जाज्ज्वल भावना कायमस्वरुपी मनात राहावी, यासाठी ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. लातूर येथे आयोजित ‘तिरंगा यात्रा’ उपक्रमाने या अभियानाला सुरुवात झाली. या अभियानामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून लातूर जिल्हावासियांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी यावेळी केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, स्काऊट गाईडचे चामे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र नागणे, नायब तहसीलदार गणेश सरोदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरीक यावेळी उपस्थित होते.
‘हर घर तिरंगा’ अभियानात अंतर्गत गाव, शहर व जिल्हा स्तरावर निबंध व वक्त्तृत्व स्पर्धा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॅनव्हास, शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय, ऐतिहासिक वास्तूंवर तिरंगा रंगातील विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तसेच १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.११ वाजता सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आदी सर्व ठिकाणी एकाच वेळी तिरंगा शपथ घेतली जाईल.
प्रारंभी जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांना तिरंगा शपथ देण्यात आली. प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी हर घर तिरंगा अभियानाची रुपरेषा सांगितली. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.