परभणी : जिल्ह्यातील स्कूलबस चालकांनी वाहन क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांची ने-आण केल्याचे आढळून आल्यास वाहनचालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे वाहतूक करण्याच्या अनुषंगाने स्कूल बस नियमावली २०११ मधील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश जिल्हा परिवहन समितीचे अध्यक्ष तथा पोलिस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता आढावा बैठक शुक्रवार, दि.९ रोजी पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्यासह शिक्षण अधिकारी तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने, वाहन चालक यांची सर्व कागदपत्रे वैध असल्याची खात्री केल्याशिवाय वाहनांस मुलांची वाहतूक करण्याची परवानगी देण्यात येवू नये असे आवाहन त्यांनी प्राचार्य तसेच पालकांना केले.
वाहन चालक यांचे गुन्हेगारी संदभार्तील रेकॉर्ड तपासल्याशिवाय वाहन मालकाने वाहन हातात न देण्याच्या सूचना केल्या. आर.टी.ओ. व वाहतूक पोलीस यांनी नियमित शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या वाहनांची तपासणी करावी, क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक करणा-या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वाहनमालकाचा मोबाईल क्रमांक वाहनाच्या मागे लिहावा. तसेच चालक रॅश ड्रायव्हींग करत असल्यास पाठीमागे लिहीलेल्या दूरध्वनीवर वाहन मालकाशी संपर्क साधावा. वाहन मालकाने योग्य प्रतिसाद न दिल्यास ११२ वर तक्रार करावी. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन चालविताना चालक मोबाईलवर बोलत असेल किंवा सिनेमातील गाणी वाजवत असेल, वाहनातील सहकर्मीनी तसे करण्यापासून त्याला परावृत करावे. याकामी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.