लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनातंर्गत वैयक्तीक सिंचन विहिर, जनावरांचा गोठा, घरकूल, बांबू लागवड, रस्ते, तुती लागवड, रोपवाटीका, शौषखड्डे, वृक्ष लागवड व संगोपणाची अशी कामे पूर्ण झाली आहेत. मात्र या कामांचे एप्रिल पासून ५३ कोटी ५३ लाख ९६ हजार ९९७ रूपये थकले आहेत. या कामांचे पैसे केंद्र सरकारकडून अद्याप पैसे मिळाले नाहीत. सदर निधी मिळावा म्हणून शेतकरी सतत पंचायत समितीकडे मागणी करताना दिसत आहेत.a
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांचे जिवनमान उंचावण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनातंर्गत सुरू आहे.शेतक-यांनी आपल्या शेतात वैयक्तीक सिंचन विहिर, जनावरांचा गोठा, बांबू लागवड, तुती लागवड, शेततळे पूर्ण केले आहेत. तसेच गावात घरकूल, रस्ते, वृक्ष लागवड व संगोपण, शौषखड्डे, ग्रामपंचायत भवन, दुतर्फा वृक्ष लागवड करणे, सार्वजनीक पाणी पुरवठा विहिर आदी कुशलची कामे ग्रामपंचायतींनी हाती घेवून ती पूर्ण केली आहेत. त्यामुळे गावाला व नागरीकांना पायाभूत सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत. कुशलची कामे पूर्ण झाली आहेत, मात्र एप्रिल पासून आज पर्यंत या कामांचे पैसे थकल्याने शेतक-यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
रोहयोच्या कामासाठी जिल्हयात ३ लाख ७७ हजार ६९० कुटूंबातील ८ लाख ९२५ नागरीकांनी रोजगारासाठी नोंदणी करून जॉबकार्ड काढले आहेत. जिल्हयातील ३३६ गावामध्ये सध्या रोहयोची ९९१ कामे सुरू असून या कामावर ३६ हजार २६४ मजूरांचे हात राबत आहेत.