26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाअमनने कांस्यपदकासह राखली भारतीय कुस्तीपटूंची लाज

अमनने कांस्यपदकासह राखली भारतीय कुस्तीपटूंची लाज

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय कुस्तीपटूंना पदकावीनाच परतावे लागले. विनेश फोगाटवर अपात्रतेची कारवाई केली गेल्याने तिचे पदक हुकले, परंतु तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे आणि त्यावर सुनावणी सुरू आहे. अमन सेहरावत याच्या कांस्यपदकाच्या लढतीकडे लक्ष लागले होते आणि त्याच्यासमोर प्युएर्तो रोकोच्या डॅरियन क्रूझचे आव्हान होते आणि त्याने क्रूझला १३-५ अशा गुणांनी पराभूत करीत भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली.

डॅरियन क्रूझने पॅन अमेरिकन स्पर्धेत २०२२ व २०२३ मध्ये प्युएर्तो रिकोचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले होते. २०२० मध्ये तो अमेरिकेकडून याच स्पर्धेत खेळला होता आणि कांस्य जिंकला होता. त्यामुळे त्याच्यासमोर अमनचा निभाव लागणे अवघडच होते. पण, अमनने २-१ अशी आघाडी घेऊन सर्वांना अचंबित केले होते. मात्र, क्रूझने दोन गुण घेऊन ३-१ अशी आघाडी मिळवली आणि त्याला अमनकडून सडेतोड उत्तर मिळाले. पहिल्या ३ मिनिटांत अमन ६-३ असा आघाडीवर होता.

ब्रेकनंतर क्रूझने अमनला मॅटवर पाडून दोन गुण घेतले होते. पण अमनचा निर्धार तो मोडू शकला नाही. क्रूझ पूर्णपणे थकलेला दिसला आणि अमनने त्याची आघाडी ८-५ अशी भक्कम केली. त्याला शेवटच्या ७० सेकंद ती टिकवायची होती. भारतीय कुस्तीपटूने जोरदार प्रदर्शन करताना १३-५ अशी आघाडी मजबूत केली आणि पदकही निश्चित केले. शेवटच्या २१ सेकंदात ही पिछाडी भरून काढणे क्रूझसाठी अशक्य होते आणि लागलीच अमन सेहरावतने भारतीय कुस्तीसाठी पहिले पदक काबिज केले.

उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर अल्बेनियाच्या झेलिमखानचे आव्हान होते आणि २०२२ च्या जागतिक अंिजक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भारतीय कुस्तीपटूने १२-० असे सहज पराभव केले. पण, पुढच्या फेरीत अव्वल मानांकित रेई हिगुचीने १०-० अशा फरकाने भारतीय खेळाडूला पराभूत केले. त्यामुळे अमनला आज कांस्यपदकाच्या लढतीसाठी खेळावे लागले. अमनने लहानपणीच आई-वडील गमावले. वयाच्या ११ व्या वर्षी अमन अनाथ झाला. तो १० वर्षांचा असताना त्याची आई कमलेश यांचे डिप्रेशनमुळे निधन झाले. एका वर्षानंतर अमनचे वडील सोमवीर यांनीही हे जग सोडले. अमनच्या काकांनी त्याची काळजी घेतली. पुरुष गटाच्या पहिल्या लढतीत अमनने नॉर्थ मॅकाडोनियाच्या व्हॅदिमीर इगोरोव्हचा १०-० असा पराभव केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR