नवी दिल्ली : ब्राझीलमध्ये मोठी विमान दुर्घटना झाली. येथील साओ पाऊलोच्या सीमावर्ती भागात एक प्रवासी विमान कोसळले. यात ५८ प्रवाशांसह एकूण ६२ जणांचा मृत्यू झाला. ब्राझीलच्या नागरी सुरक्षा विभागाने देखील अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमान कोसळल्याने अनेक घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात विमानातील सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्राझीलचे अध्यक्ष लूला डी सिल्वा यांनी दिली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत नागरिकांना एक मिनिटाचे मौन राखून मृतांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान वोपास लिन्हास एरियासकडून चालवण्यात येत होते. एअरलाईन वोपासनेही विमान कोसळल्याची पुष्टी केली आहे. वोपास एअरलाइन्सद्वारे संचालित एटीआर ७२-५०० हे विमान कास्केवेल येथून साओ पाऊलो येथील ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे उड्डाण करत असताना विन्हेडो शहरात अपघात झाला. या विमानात ६२ लोक होते. यामध्ये ५८ प्रवासी आणि ४ क्रू मेम्बर्सचा समावेश होता. हे सर्वजण या विमान अपघातात मृत्युमुखी पडल्याचे अधिका-यांनी सांगितले. विमान जमिनीपासून १७ हजार फूट उंचीवर असताना अचानक दोन मिनिटांत ४ हजार फूट खाली आले. त्यानंतर त्याचा जीपीएस सिग्नल नकाशावर दिसायचा बंद झाला.
विमान अपघाताचा एक व्हीडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात स्पष्ट दिसत आहे की, हवेत झेप घेतलेले विमान अवघ्या २ मिनिटांतच एखाद्या कागदाच्या पानासारखे हवेत फिरताना दिसत आहे. विमान जमिनीवर कोसळताच आसमंतात काळा धूर पसरताना दिसतो आणि जमिनीवर कोसळताच त्याला आग लागल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी दु:ख व्यक्त केले. अपघातातील मृतांसाठी एक मिनिट मौन पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.