अमरावती : प्रतिनिधी
अमरावती मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी दिवसागणिक आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. कारण राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ , त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ आणि प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.
त्यामुळे त्यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप आणि टीकेची झोड रंगताना हल्ली बघायला मिळत आहे.
अशातच आमदार रवी राणा यांनी आता पलटवार करत आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांची भूमिका कटप्पासारखी असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांना मी सन्मान दिला. पण आनंदराव अडसूळ यांनी एका महिलेबाबत किती पातळी सोडून बोलायचं, त्यांनी त्याचे सुद्धा भान ठेवले पाहिजे.
मी महायुतीमधून बाहेर पडायचं की नाही, हे सांगणारे अडसूळ कोण? त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तो निर्णय घेतील आणि ठरवतील. मी आजही महायुतीमध्ये आहे. उद्याही महायुतीमध्येच राहील. पण त्यांनीच १५ दिवसांचा अल्टिमेट दिला होता. मला जर राज्यपाल पद मिळालं नाही तर मी विचार करेल, असे ते म्हणाले होते.