ढाका : वृत्तसंस्था
भारताच्या शेजारील बांगलादेशात सध्या राजकीय अस्थिरतेचा काळ पाहायला मिळत असून सध्या शेजारील राष्ट्रात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आपल्यासोबत देशाची प्रगतीही घेऊन बाहेर पडल्या आहेत. जुलैमध्ये त्यांच्याविरोधातील आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन सरकारने अवलंबलेल्या दडपशाही धोरणांनी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे.
बांगलादेशचा जीडीपी सुमारे १.६ ट्रिलियन डॉलर आहे, जो जगातील टॉप-२५ अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. देशाने रेडिमेड कपड्याची निर्यात सुरू केल्यावर बांगला देशच्या अर्थव्यवस्थेत सर्वांत मोठा बदल घडून आला. आपल्या याच वैशिष्ट्याच्या जोरावर बांगला देशच्या अर्थव्यवस्थेला नवी चमक मिळाली. पण आता जुलैमधील बांगलादेशचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स २७ अंकांनी घसरून ३६.९ वर आला. या निर्देशांकानुसार बाजारातील आर्थिक क्रियाकलाप वाढत आहेत.
पीएमआय निर्देशांकात प्रामुख्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील क्रियाकलाप लक्षात घेतले जाते. निर्देशांकाचे रेटिंग ५० राहिले तर बाजारात हलगर्जीपणाची लक्षणे दिसत आहेत, म्हणजे बाजार ना वर जात आहे ना खाली. त्याचवेळी यापेक्षा कमी रेटिंग म्हणजे बाजार खाली घसरत आहे. बांगलादेशचे पीएमआय रेटिंग जुलैमध्ये ३६.९ होते, जे ५० पेक्षा खूप कमी आहे. बांगलादेशातील हिंसक निदर्शने आणि त्यांना दडपण्यासाठी केलेले प्रयत्न त्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरून बांगला देशात पेटला वाद
गेल्या महिन्यात देशभरात आरक्षणाविरोधात निदर्शने सुरू झाली, ज्यामध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात (१९७१) शहीद कुटुंबीयांना सरकारी नोक-यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्यात आले. शेख हसीना यांनी या आरक्षणातून त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांना फायदा करून दिल्याचा आरोप करण्यात आला, जे काढून टाकण्याच्या मागणीमुळे आंदोलने झाली, ज्याने हळूहळू हिंसक वळण घेतले. प्रकरण इतके चिघळले की हिंसक घटनांमध्ये ३०० लोकांचा मृत्यू झाला.
बांगला देशात राजकीय अस्थिरता
१५ जुलैपासून बांगला देशात संघर्ष सुरू झाला तर गेल्या रविवारी जोरदार निदर्शने झाली आणि शेख हसीना यांच्यावर देश सोडण्याची नामुष्की ओढवली. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले. शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता आश्रय शोधत आहेत.