सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठे आहे. पारतंत्र्यातही सलग ४ दिवस स्वातंत्र्य उपभोगणारे सोलापूर हे भारतातील पहिले शहर ठरले,असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. परमपूज्य महा तपस्वी कुमारस्वामीजींच्या ११५ व्या जयंती महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना “1942 च्या चले जाव चळवळीत सोलापूरचे योगदान” या विषयावर ते बोलत होते.याप्रसंगी उषा लोणी, संध्यारजनी दानवे, हिरा कुंभार, सुभाष मुंढेवाडीकर, सैनिक शाळेचे ढगे , गाजूल , वेदमूर्ती बसवराज स्वामी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. श्रीकांत येळेगावकर पुढे म्हणाले, ९ ऑगस्ट १९४२ या दिवशी मुंबई येथे अरुणा असफली यांनी स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवला. 1877 ते 1910 या कालावधीमध्ये सोलापूरला जुनी गिरणी, नरसिंग गिरजी मिल, विष्णू मिल, लक्ष्मी मिल इत्यादी मोठ्या कापड मिलची सुरुवात झाली होती. कामगारांची संख्या मोठी होती. महात्मा गांधींनी एप्रिल 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती. त्यावेळेस त्याला सोलापूर अपवाद नव्हते. या काळात सोलापुरातील दुकाने बंद होती. गिरण्या बंद होत्या.
मिरवणुका, घोषणा, दारूच्या दुकानाची नासधूस असे प्रकार झाले. रेल्वे अडवण्यात आली. त्यावेळेस पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि लाठीमार झाला. ब्रिटिश सरकारच्या विरोधात सोलापुरात मोठे आंदोलन केले गेले. पोलीस चौकी पेटवल्या. 9 ते 12 मे 1930 या चार दिवसात सोलापूर शहरात ब्रिटिश शासन नव्हते. सलग ४ दिवस स्वातंत्र्य उपभोगणारे सोलापूर हे भारतातील पहिले शहर ठरले. 12 मे 1930 रोजी सोलापुरात मार्शल कायदा पुकारण्यात आला. सोलापूरचे नाव ब्रिटिश संसदेत चर्चिले गेले. पोलिसांच्या गोळीबारात त्यावेळी सोलापूरचे शंकर शिवदारे ठार झाले. ते सोलापूर शहरातील पहिले हुतात्मा ठरले.
ब्रिटिशाविरुद्धच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे देशभक्त जगन्नाथ शिंदे, किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन यांना अटक केली. 12 जानेवारी 1931 रोजी या चौघा क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. अत्यंत कष्टातून, बलिदानातून, त्यागातून प्राप्त झालेले स्वातंत्र्य टिकवले पाहिजे,असे आवाहन डॉ. येळेगावकर यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीचे पूजन होऊन चनबसप्पा अलमेलकर यांच्या भक्ती गीताने झाली. आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी प्रास्ताविक केले.राजेंद्र मायनाळ यांचा वाढदिवसानिमित्त डॉ. येळेगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विश्वस्त विश्वनाथ म्हेत्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपाध्यक्ष निळकंठप्पा कोनापुरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन नागनाथ चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव बाबासाहेब कुलकर्णी यांनी केले.