नागपूर: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. निरपराध लोकांवर गुन्हे दाखल झाले, याला दोषी भाजप सरकार आहे. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. हे तीन तीन इंजिन राज्यात आग लावायला आहेत का? असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोप देखील त्यांनी या वेळी केला.
नाना पटोले म्हणाले, वारंवार राज्याचे वातावरण दूषित करण्याचे काम हे भाजप करत आहे. राज्यातील घटनांचा क्रम बघितला तर जरांगे यांचे आंदोलन सुरू असलेल्या गावात लाठीमाराचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले, असे ते स्वत: सांगतात. मात्र लाठीमार कशासाठी केला गेला हे अद्याप अनुत्तरित आहे. पोलिस अधिका-यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर हा वाद राज्यभर पेटला आहे. राज्याचे मंत्री जाती-समूहात भांडण निर्माण करत असतील तर हे सर्व सरकारप्रणीत आहे. या प्रकरणी अनेक मराठा आंदोलक तरुणांनी आत्महत्या केल्या.
नाना पटोले म्हणाले, राज्यात जर जातनिहाय जनगणना केली असती तर सगळे प्रश्न सुटले असते.छत्तीसगडमध्ये आदिवासींचे,ओबीसींचे सर्व आरक्षण वाढविले आहे. भाजपला आरक्षणमुक्त देश करायचा आहे. भाजपची आणि आरएसएसची हीच भूमिका आहे. आरएसएस आणि भाजप काही वेगळे नाहीत.आरक्षण मागासवर्गाला मिळाले पाहिजे ही काँग्रेसची कायम भूमिका आहे.फडणवीस आणि गडकरींनी २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी देशात आणि राज्यात सत्ता द्या आम्ही आरक्षण देतो अशी ग्वाही दिली होती. आता आरक्षण त्यांनी कसे द्यायचे हे त्यांनी ठरवावे. आरक्षण दिल्यानंतर सरकारचेच वकील कोर्टात जातात.गेल्यावेळी कोर्टात कोण गेले होते ते सगळ्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा निर्णय सरकारने घेऊ नये.
भाजपने देशात संविधान संपवण्याचे काम सुरू केले आहे. असे असले तरी जे जे संविधान व्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्याबरोबर काँग्रेस कायम उभी राहील. वंचित सभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना निमंत्रण दिले होते,पण ते तेलंगणात प्रचारात असल्याने ते त्या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. म्हणून राहुल गांधींनी मला सांगितले की, मी प्रचारात असल्याने तुम्ही स्वत: माझे प्रतिनिधी म्हणून त्या सभेला जा. म्हणून राहुल गांधी यांचा प्रतिनिधी म्हणून या सभेला मी उपस्थित राहणार असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
राज्य अस्थिर असताना फक्त उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना डेंग्यूचा आजार असताना देखील ते दिल्लीमध्ये ये-जा करतात. मात्र राज्यात जेव्हा दोन समूहांत भांडण सुरू होते, राज्यात अस्थिरता निर्माण होत असताना त्यांना उपस्थित राहता येत नाही. अशा परिस्थितीत लोकांना तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असा घणाघात देखील नाना पटोले यांनी अजित पवारांवर केला आहे.