बारामती : प्रतिनिधी
‘पवारसाहेब’ आणि बारामतीकरांचे सहा दशकांचे प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. त्यासाठी कोणतीही योजना नाही. नाती १५०० रुपयांनी जोडली जात नाहीत. ती मनाने जोडली जातात. अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.
दरम्यान, शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या महावीर भवन येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी सुळे पुढे म्हणाल्या, मला विचाराले तर तो नात्यांचा अपमान आहे.
नाती ‘दिलसे’ असतात. पैशाच्या नात्यांना व्यवहार म्हणतात.
नात्यांमध्ये प्रेम असते, व्यवहार नसतो. ज्यांना नातीच कळाली नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या हातात कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कोणतेही सत्ता केंद्र नव्हते. पण मायबाप जनता सोबत असल्यामुळे आपण विजयी होऊ शकलो.
बारामती आपली आण-बाण आणि शान आहे, पण बारामतीमध्ये अनेक विकास कामांमध्ये गुणवत्ता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथील विकासकामांमध्ये आपण लक्ष घालणार असल्याचे सांगितले. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी आपल्याला सरकार बदलायचे आहे, त्यामुळे सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन सुळे यांनी केले.