छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली असून पावसाच्या पाण्याने धरणे तुडुंब होत आहेत. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रमुख धरणांपैकी असणारी पाच धरणे १०० टक्के भरली असून यंदा हजारो गावांची तहान भागणार आहे.
राज्यात झालेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून बंधा-यांमधून नदीपात्रांमध्ये विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शेती व सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असल्याने दिलासा देणारे चित्र आहे.
पुणे विभागातील बहुतांश धरणे आता भरत आली असून भाटघर, वीर आणि उजनी धरण १०० टक्क्यांनी भरले आहे. नीरा देवघर धरणात ९७.२० टक्के, चाकसमान ९९.०२ टक्के, पवना ९५.२७ टक्के, खडकवासला ८१.४३ टक्के, पानशेत ९९.१३ टक्के, डिंभे ८३.७९ टक्क्यांनी भरले आहे. सध्या या सर्व धरणांमधून विसर्ग सुरू असून मुळा, मुठा, भीमा, मीरा नदीपात्रात पाण्याची आवक होत आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूरमधील धरणांची ही स्थिती सध्या चांगली असून बहुतांश धरणे ८० टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. कोल्हापूरचा दूधगंगा प्रकल्प ८५.९५ टक्क्यांनी तर राधानगरी ९७.८२ टक्के भरला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी, साता-यातील वीर, पुण्यातील भाटघर व आंद्रा, गोंदियामधील इटियाडोह ही पाच धरणे १०० टक्क्यांनी भरली आहेत. पुणे, नाशिक विभागातील बहुतांश धरणांमध्ये चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. कोकणातील धरण साठा ९० च्या पुढे गेला असून मराठवाडा, अमरावती व नागपूर विभागात पाणी पातळीत वाढ होत आहे.
कोणत्या धरणांमध्ये कसा आहे पाणीसाठा?
जलसंपदा विभागाने सादर केलेल्या राज्यातील महत्त्वाच्या धरण साठ्यांमधील पाण्याच्या अहवालानुसार कोकणातील बहुतांश धरणे आता भरली असून ९० टक्क्यांच्या पुढे उपयुक्त पाणीसाठा आहे. ठाण्यातील भातसा ९२.५३ टक्के तर सूर्या धामणी धरण प्रकल्पात ९४.९३ टक्के पाणी आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील मोठ्या व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा आता वाढला असून ८० टक्क्यांच्या पुढे उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. यात दारणा ९२.९६ टक्के, गंगापूर ८८.९७ टक्के, गिरणा ३६.९६ टक्के, तर अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ९५.२८ टक्के, मुळा ७२.१७ टक्के, निळवंडे ८३.१२ टक्के भरले आहे.
राज्यातील विभागनिहाय धरणसाठा
राज्यात झालेल्या जोरदार पावसानंतर आणि धरणविसर्गानंतर राज्याचा उपयुक्त सरासरी पाणीसाठा ६७.८७ टक्के आहे. यात नागपूरच्या एकूण ३८३ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५.७१ टक्के, अमरावतीच्या २६४ धरणांमध्ये ६३.५६, मराठवाड्यातील ९२० एकूण धरणांमध्ये २६.७० टक्के पाणीसाठा राहिला आहे. नाशिकच्या सर्व धरणांमध्ये ६१.८९ टक्के, पुण्यातील ७२० धरणांमध्ये ८३.३१ टक्के तर कोकणातील १७३ धरणे ८९.४२ टक्के भरली आहेत.