नवी दिल्ली : अवघ्या १०० ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे भारताची अनुभवी कुस्तीगीर विनेश फोगटचे ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरेच राहिले. ५० किलो वजनी गटात खेळणा-या विनेशचे अंतिम फेरीच्या दिवशी वजन अधिक भरल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून थेट अपात्र ठरविण्यात आले. या धक्कादायक घटनेनंतर देशभरातील तिच्या लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.
देश-विदेशातून त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. पदक कमावले नसले तरी विनेशच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे मत काहींनी मांडले. तर काहींनी विनेशवर टीकासुद्धा केली. अशातच एका भाजप नेत्याच्या कमेंटवरून सोशल मीडियावर नवीन वाद सुरू झाला. या कमेंटचा केवळ जाट समाजाने विरोधच केला नाही तर त्याविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केली आहे. इतकेच नव्हे तर लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही संबंधित भाजप नेत्याला सुनावले आहे.
विनेश फोगटबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणा-या व्यक्तीचे नाव विशाल वार्षणेय आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर या व्यक्तीने त्याच्या नावापुढे भाजप असे लिहिले आहे. त्यामुळे ही व्यक्ती भाजपचा नेता किंवा कार्यकर्ता असल्याचे मानले जात आहे. विनेश अपात्र ठरल्यानंतर त्याने पोस्ट लिहिली, लैंगिक शोषणाचा आरोप तर केलाच होता. दोन-चार कपडे काढून टाकले असते तर २०० ग्रॅम वजन कमी भरले असते. याच पोस्टवरून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जाट समाजाने या पोस्टचा विरोध केला असून त्यांनी एफआयआरसुद्धा दाखल केली.
समाज माध्यमांवर संताप
या वादादरम्यान प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही संबंधित भाजप नेत्याला सुनावले आहे. भाजप नेत्याच्या पोस्टवर तिने लिहिले, ‘आक थू!’ नेहा सोशल मीडियावर विविध मुद्यांवर बेधडकपणे मते मांडताना दिसते. विनेशबद्दल अशी पोस्ट लिहून केवळ तिचाच नाही तर देशाचाही अपमान केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.