धाराशिव : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक आली की, प्रत्येकाला आमदार व्हावेसे वाटते, परंतू आपण यापुर्वी पक्षासाठी काय केले. किती वेळ दिला याचा पक्षाकडून विचार केला जातो. तसेच त्या उमेदवाराने ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यासारखी पदे उपभोगली का? याचाही विचार केला जातो. परंतू अलीकडे असा कोणीच विचार करायला तयार नाही. त्यात तुळजापूर विधानसभेसाठी एक उद्योगपती यांना विधानसभा निवडणूक आली की आमदारकीचे डोहाळे लागतात.
ऐरवी पाच वर्षे ना पक्षासाठी ना जनतेसाठी त्यांना मतदार संघात वेळ नसतो. तसेच पक्षनिष्ठेबाबत बोलायचे झाले तर ऐनवेळी कोणाचा झेंडा घेतील हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र सध्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी मतदार संघात येणार म्हंटले की, पक्षनिष्ठा आणि समाजकार्याचा मोठा गवगवा होताना दिसत आहे. त्यामुळे अशा लोकांना पक्षश्रेष्ठीने संधी देणे म्हणजे पक्षाची अब्रुच घालवणे आहे, अशी मतदार संघातून चर्चा सुरु आहे.
तुळजापूर विधानसभा मदार संघात भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील हे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी मागील निवडणूकीत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा पराभव करुन विजयी मिळवला होता. माजी मंत्री चव्हाण यांचा पराभव होण्यासाठी सध्या तुळजापूर विधानसभेसाठी इच्छूक असलेले हेच उद्योगपती महाशय यांनी पक्षनिष्ठेला मुठमाती देत ऐनवेळी इतर पक्षात प्रवेश करुन निवणूक लढविल्यामुळे जबाबदार आहेत, अशी चर्चा संपुर्ण तुळजापूर विधानसभा मतदार संघात आहे.
पारंपारीत हा मतदार संघ महाविकास आघाडीत कंॉग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागाकंॉग्रेसला सुटण्याची शक्यता असून ऐनवेळी ही जागा महाविकास आघाडीत कोणालाही मिळू शकते. अशी परिस्थिती असल्यामुळे हे उद्योगपती महोदय जागा कोणालाही सुटली तरी उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचे चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे हे महाशय ऐनवेळी कोणत्या पक्षात राहतील हे सांगता येत नाही. दोन डगरीवर हात ठेवून संपर्कात आहेत. त्यामुळे मागील निवडणूकीसारखे हे महाशय ऐनवेळी कोणत्या पक्षाचा झेंडा घेतील हे सांगता येत नाही.
पक्षासाठी वेळ नाही, जनतेसाठी कार्य नाही, आणि विधानसभा निवडणूक आली की आमदारकीचे डोहाळे लागतात. दोन ते तीन महिन्यात पक्षश्रेष्ठीकडे गाठीभेटी वाढवणे, संपर्कात असल्याचे दाखवणे आणि मतदार संघात पेश्याच्या जोरावर समाजकार्याचा आव आणणे असे प्रकार सुरु होतात. तशीच परिस्थिती या उद्योगपती महोदयांची मागील २०१९ च्या निवडणूकीत दिसून आली. त्याची पुन्हा २०२४ च्या निवडणूकीत पुनरावृत्ती तुळजापूर विधानसभा मतदार संघात दिसून येवू लागली आहे. मतदार संघात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करुन मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे पक्षनिष्ठेचे तीनतेरा वाजवलेल्या या उद्योगपती महोदयांना पक्षाकडून उमेदवारी मिळणे म्हणजे पक्षाचे हसूच म्हणावे लागेल. पक्षात अनेक वर्षापासून निष्ठेने काम करणारे तुळजापूर विधानसभा लढविण्यासाठी इच्छूक आहेत. पक्ष त्यांचाच विचार करेल, अन्यथा पक्षाचेच निष्ठावंत अशांचे काम करणार का? हा मोठा प्रश्न आहे.