28 C
Latur
Wednesday, September 25, 2024
Homeराष्ट्रीयकेदारनाथसाठी नवीन मार्ग सापडला

केदारनाथसाठी नवीन मार्ग सापडला

चौमासी : आताच्या तरुणाईचे स्वप्न असते आयुष्यात एकदा तरी केदारनाथला जायचे. मात्र तेथील मार्गामुळे अनेकांना तेथे जाणं जमत नाही. मात्र आता केदारनाथला जाणा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. केदारनाथला जाण्यासाठी नवीन सोपा मार्ग सापडला आहे. या मार्गामुळे आता अनेकांचं केदारनाथला जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. हा मार्ग आधीच्या रस्त्यापेक्षा अधिक सोपा आणि कमी लांबीचा आहे. तसेच यात घाट रस्ता कमी आणि गवताळ प्रदेश कमी आहे. यामुळे भाविकांना जास्त त्रास होणार नाही.

केदारनाथसाठी नवा मार्ग सापडला आहे. गुप्तकाशीपासून थोडे पुढे गेल्यावर एक रस्ता कालीमठकडे जातो. गुप्तकाशीपासून चार-पाच किलोमीटर गेल्यावर कालीमठ येथे उतरून येथे जाता येते. यानंतर चौमासी गाव येथून १० किलोमीटर अंतरावर आहे. या गावातून चढाई करून तुम्ही पुढील सात ते आठ तासात केदारनाथ धामला पोहोचू शकता. येथील लोक घोडे, खेचर घेऊन रामबाड्याला जात असत. २०१३ च्या आपत्तीच्या वेळी या मार्गावरून प्रवास केला जात असे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मार्ग रामबाडा आणि केदारनाथ दरम्यान चार ठिकाणांहून निघतो आणि नंतर खाम बुगियाल येथे संपतो. चौमासी ते केदारनाथ मंदिर हे अंतर १९ किमी आहे. जे सोनप्रयाग ते मंदिरापर्यंतच्या सध्याच्या २१ किमी लांबीच्या मार्गापेक्षा २ किमी कमी आहे.

हा मार्ग अधिक सुखकर
या मार्गावर अद्याप एकदाही दरड कोसळलेली नाही. हा रस्ता रॉक आणि व्हॅली आहे. अतिशय सुंदर परिसर आहे. या परिसरात एक छोटी नदीही आहे. आपत्तीपासून केदारनाथचा रस्ता दुरुस्त केला जात आहे. त्यासाठी रामबाडा येथून गरुडछत्तीचा विकास करण्यात येत आहे. यासह लिंचोलीमार्गे आपत्तीनंतर बांधलेल्या रस्त्यावरही वाहतूक सुरू आहे. यासोबतच चौमासी हा पर्यायी मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान रुद्र प्रयाग जिल्हा प्रशासनाने चौमासी येथून मंदिराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यासाठी एक पथक पाठवले होते. हा गट परत आला आहे. त्यांनी अद्याप आपला अहवाल सरकारला सादर केलेला नाही, परंतु या चमूचे नेतृत्व करणा-या एका तज्ज्ञाने सांगितले की, चौमासी मार्गावर दरड कोसळण्याचा धोका नाही, कारण येथे डोंगरी नाले नाहीत. हा मार्ग गवताळ प्रदेश आणि कमी घाट असलेला आहे. सध्याचा मार्ग १० ते १२ हजार फुटांवर आहे, तर नवीन मार्गाची उंची ६ ते ९ हजार फूट आहे. तिथे कमी खडी आहे. कोणत्याही परिस्थितीत येथे हेलिकॉप्टर सेवा सुरळीत राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR