नागपूर : प्रतिनिधी
नागपूरचा विकास आज देशात गाजतोय. सिमेंट रस्त्याची जाणीव मी २०१९ ला करून दिली होती. त्यामुळे केळीबाग असेल किंवा इतर विकासकामे आहेत ते बघता सरकारने स्वत:चा कसा विकास केला हे बघितले पाहिजे.
उपराजधानी नागपूरसारख्या शहरात पावसाळ्यात नाव चालते, अजून किती विकास पाहिजे? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरींवर जोरदार निशाणा साधला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
दरवर्षी नागपूर येथे होणारे नुकसान आपण पाहिले आहे. विकासाच्या नावातून झालेला भ्रष्टाचार आज शहरांमध्येही पाहायला मिळतो आहे. आज ग्रीन बेल्ट उद्ध्वस्त करताय, त्याचेच परिणाम डेंग्यू, चिकन गुनियासारख्या आजारांनी डोके वर काढले असून नागपूरकरांना या आजारांना सामोरे जावे लागते आहे. आधी विकासाची कामे व्हायची, आता स्वत:च्या विकासाची कामे होत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
नागपुरात येत्या २२ तारखेला मोठा मोर्चा आम्ही करतोय. सेबीचा घोटाळा हिंडेनबर्गच्या माध्यमातूम समोर आला आहे. बँकेत आम्ही पैसे टाकतो तर टाकायला आणि काढायला पैसे लागतात. मध्यमवर्गीय आज शेअर्समध्ये पैसे लावतात. मात्र, या पैशावरही डाका कसा टाकता येईल हे आता होताना दिसत आहे. शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूचे खासगीकरण करण्याचा घाट सरकारचा आहे. एकुणात देशच लिलावात लागला आहे. त्यांनी लाल किल्ला पण देऊन ठेवला आहे. केवळ आपल्या बगलबच्चांना मोठे करायचे काम हे सरकार करत असल्याचा घणाघातही नाना पटोले यांनी केला आहे.