कोयनानगर : प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण मंगळवारी (दि. १३) रात्रीपासून विद्युत रोषणाई व प्रोजेक्टरच्या माध्यमातून तिरंग्यासह विविध विद्युत दृश्यांनी उजळून निघाले.
‘हर घर तिरंगा’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत कोयना धरण व्यवस्थापनाने दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत ही विद्युत रोषणाई साकारली आहे. या रोषणाईचे व्हीडीओ, फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरातील नागरिकांसह पर्यटकांची गर्दी होत आहे. धरणाच्या समोरील कोयना नदीवरील पुलावरून विद्युत रोषणाई पाहता येणार आहे.
कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर हे पाणी धरणाच्या भिंतीवरून फेसाळत कोयना नदीपात्रात जात असते. या फेसाळलेल्या पांढ-या शुभ्र पाण्यावर प्रोजेक्टरच्या माध्यमातून तिरंगासह स्वातंत्र्य दिनाची विविध दृश्यं साकारली आहेत. तसेच धरणाच्या भिंतीवर शार्पी लाईटचे प्रकाशझोत फिरत असल्याने किरणांच्या विविध छटा तयार होत आहेत. ही रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांसह स्थानिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.