वॉशिंग्टन : बांगला देशच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केल्याचा आरोप अमेरिकेचे व्हाईट हाऊसने फेटाळून लावला आहे. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर बांगला देशात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव कॅरिन जीन पियर यांनी सांगितले की बांगला देशातील राजकीय अस्थिरतेत आमचा सहभाग नाही. या घटनांमध्ये अमेरिकी प्रशासनाचा सहभाग असल्याच्या कोणत्याही बातम्या किंवा अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. बांगला देशातील लोकांचे भविष्य ठरवणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे.
लोकांना हिंदू मंदिरे, चर्च किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरील हल्ल्यांबद्दल माहिती देण्यासाठी बांगला देशच्या सरकारने हॉटलाइन स्थापन केली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि भारतात आश्रय घेतल्यानंतर धार्मिक स्थळे, दुकाने आणि अल्पसंख्याकाच्या मालमत्तेची तोडफोड केल्याच्या बातम्यांदरम्यान हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बांगला देशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी मंगळवारी येथील प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरात पीडित हिंदू समुदायाच्या सदस्यांची भेट घेऊन दिलासा दिला. पूजाउजपन परिषदेचे अध्यक्ष बासुदेव धर, सरचिटणीस संतोष शर्मा, सर्वजनीन पूजा समितीचे अध्यक्ष जयंत कुमार देव, सरचिटणीस तपस चंद्र पाल आणि हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषदेच्या अध्यक्षीय सदस्य काजोल देबनाथ आणि संयुक्त महासचिव मनींद्र कुमार नाथ उपस्थित होते.