मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला आहे.
दरम्यान, सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? यावरून चर्चा सुरु आहेत. आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठिंबा देतो.
निवडणूक आयोग आज काहीतरी घोषणा करणार आहे. माझं मत आहे की आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकच जाहीर करून टाकावी. आमची तयारी आहे. तयारी आहे हे बोलायला सोप्प वाटते. मात्र, ही लढाई पाहिजे तेवढी सोपी नाही. लोकसभा निवडणुकीत आपण राजकीय शत्रूला पाणी पाजले. लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या संरक्षणाची लढाई होती. आता ही लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे.
ही लढाई कशी असावी एक तर तू राहशीलकिंवा मी राहील. तू राहशील किंवा मी राहील ही लढाई आपल्या मित्र पक्षात नको, म्हणजे महाविकास आघाडीत नको. जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत, त्यांना आपण मिळून एकतर तू राहशील किंवा मी राहील हे सांगू , असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महायुती सरकारला आता जाग आली आहे. आता ते पाण्यात डुबक्या मारून पवित्र होता येईल का? पाहत आहेत. मग ते सगळीकडे स्वत:चे फोटो छापत आहेत. मात्र, आपण ही निवडणूक अशी लढायची हे आपण ठरवायचं आहे. पण आपल्यामध्ये काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे चेहरा आहेत की आणखी कोण आहे? मी आता या ठिकाणी सांगतो, येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो , अशी घोषणाच उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.