रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजकारणात पुन्हा शिमगा सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांनी भ्रष्टाचार करून विजय मिळवल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेवर ठाकरे गटाने मोठा आक्षेप नोंदवला आहे. उद्धव ठाकरे सेनेचे विनायक राऊत यांनी सदर याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हायकोर्टाने खासदार नारायण राणे यांना समन्स बजावले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी या निवडणुकीत मते विकत घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. राणे यांनी मतदारांना धमकावले आणि विजय मिळवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करत त्यांनी राणे यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे.
याचिकेत नारायण राणे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे.
नारायण राणे यांनी मते विकत घेतली. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचे याचिकेत म्हटले आहे. नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिका-यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी पण निवडणूक निर्णय अधिका-यांनी घेतली नाही. आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.