26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यातील दोन्ही मंडळांत अग्रीम मिळणार

जळकोट तालुक्यातील दोन्ही मंडळांत अग्रीम मिळणार

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी कुठे अतिवृष्टी तर कुठे अवर्षण अशी परस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला होता, अशा स्थितीत तालुक्यातील शेतक-याना २५ टक्के अग्रीम पीक विमा मिळावा अशी मागणी करण्यात येत होती. यापूर्वी जळकोट तालुक्यातील एकाच मंडळाला २५ टक्के अग्रीम पिक विमा मिळणार होता परंतु आता जळकोट तालुक्यातील दोन्हीही मंडळातील शेतक-यांना २५ टक्के अग्रीम मिळणार आहे. यामुळे जळकोट तालुक्यातील शेतक-यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी घोणसी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली यामुळे शेत शिवारामध्ये पाणी शिरून शेतीमधील पिके वाहून गेली. यामुळे शेतक-यांच्या पिकांचे तसेच जमिनीचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची खुद्द राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे , जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे , मुख्य कार्यकारी अधिकारी सागर यांच्यासह अनेक नेते मंडळी तसेच अधिका-यांनी पाहणी केली होती. तसेच दुसरीकडे जळकोट मंडळामध्ये खूपच कमी पाऊस झाला होता. जून जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला. यामुळे पिकांची उगवण व्यवस्थित झाली नाही यामुळे या मंडळामध्ये आवर्षण स्थिती निर्माण झाली.

शेतक-याच्या डोळ्यासमोर सोयाबीन वाळून गेले तसेच कापूस देखील वाळून गेला. मूग उडीद तरी हातातदेखील आले नाही. यामुळे या भागातील शेतक-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले . यावर्षी शासनाच्या वतीने शेतक-यांंना एक रुपयांमध्ये पिक विमा भरण्याची सोय करण्यात आली होती . यामुळे जवळपास सर्वच शेतक-यांनी पिक विमा भरून घेतला होता. जळकोट तालुक्यातील शेतक-याचे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी पिक विमा मंजूर होईल अशी अपेक्षा होती परंतु विमा कंपनीकडून काही केल्या पीक विमा मंजूर होत नव्हता. शेवटी जिल्हाधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतक-याना २५ टक्के पीक विमा अग्रीम मंजूर करावा असे आदेश काढले. यानंतर अग्रीम देण्यासाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या.

मात्र जळकोट तालुक्यातील या २५ टक्के पीक विमा अग्रीम साठी एकच मंडळ पात्र ठरले होते . यानंतर जळकोट तहसील कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील अधिका-यांंनी व्यवस्थित अहवाल पाठवल्यामुळे संपूर्ण जळकोट तालुक्यातील शेतक-यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा मिळणार आहे. येणा-या काही दिवसांमध्ये शेतक-यांच्या खात्यावर अग्रीम पिक विमा रक्कम जमा होणार आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR