नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून वाळवी या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित या सिनेमाची गोष्ट प्रेक्षकांनाही आवडली होती. त्यातच आता राष्ट्रीय पातळीवर या सिनेमाचा गौरव केला जाणार आहे. त्यामुळे तिस-यांदा परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्या सिनेमाला पुरस्कार मिळाला.
हरिश्चंद्राची फॅक्ट्री, एलिझाबेथ एकादशी आणि आता वाळवी असे तिनही सिनेमे परेश मोकाशीने दिग्दर्शित केले होते. हरिश्चंद्राची फॅक्ट्री, एलिझाबेथ एकादशी या दोन्ही सिनेमांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. भारतीय चित्रपसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित हरिश्चंद्राची फॅक्ट्री हा सिनेमा होता. त्याचप्रमाणे आईच्या कष्टासाठी मुलांनी घेतलेली मेहनत यावर एलिझाबेथ एकादशी सिनेमाची गोष्ट होती. मधुगंधाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत परेश आणि मी आम्ही एकत्र केलेल्या चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांची हट्ट्रिक असल्याचे म्हटले.
वाळवी या सिनेमाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. लाकडाला वाळवी लागली तर ती लाकूड पोखरून काढते, याचप्रकारे जर नात्याला वाळवी लागली तर काय होते, हे या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळाले आहे.
इतर भाषांतील चित्रपटांचाही गौरव
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कंतारा चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुुरस्कार जाहीर झाला. कार्तिकेय २ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पोनियिन सेल्वन १ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. केजीएफ चॅप्टर २ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. केजीएफ चॅप्टर २ ला सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफीचा पुरस्कार मिळाला. मनोज बाजपेयी यांना गुलमोहरसाठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला. संजय सलील चौधरी यांना कढीकन चित्रपटातील संगीतासाठी विशेष पुरस्कार मिळाला.