परभणी : राज्यातील सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असुन नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने नाराजीतून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील या सरकारला घालविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता सज्ज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने शनिवार, दि. १७ रोजी ते परभणीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, खा. फौजिया खान, माजी आ. विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष ऍड. विजय गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्ष मनिषा केंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, ९ ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रेच्यानिमित्ताने जिल्हानिहाय संपर्क करण्यात येत असून या दौ-यात ठिकठिकाणी महायुती सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड असा रोष आहे. राज्य शासन सर्वच आघाड्यावर अपयशी ठरत असल्याने राज्यातील जनता फक्त निवडणुकीचा वाट पाहत आहेत.
लोकसभा निवडणुकीत ३१ मतदार संघात महायुतीच्या विरोधातील रोषामुळे महाविकास आघाडी सरकारला घवघवीत यश मिळाले आहे. आता राज्यातील महायुती सरकार विविध योजनांच्या माध्यमातून जनतेमधील रोष कमी करण्याचा प्रयत्न करीत असून त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सध्या राज्यातील अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून जिल्हा नियोजन समितीला दिलेल्या निधीला कात्री लावली जात आहे. तसेच मागासवर्गीय विभाग, आदिवासी विभागाचा निधीही या योजनेसाठी वळविण्यात येत आहे. मराठा आरक्षणा संदर्भात सरकार जो निर्णय घेईत त्यास आमचे समर्थन राहिल. जरांगे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली हे ही त्यांनी उघड करावे असे ते म्हणाले.