17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक, नगरच्या धरणांतून जायकवाडीत सोडले पाणी

नाशिक, नगरच्या धरणांतून जायकवाडीत सोडले पाणी

नाशिक/नगर : प्रतिनिधी
बराच वाद आणि गोंधळानंतर अखेर नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास दारणा धरणातून १०० क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. याबरोबरच नगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरा धरणातूनही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले आहे. ४८ तासांत हे पाणी जायकवाडीत पोहोचणार आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर याला झालेला विरोध आणि न्यायालयीन लढाईनंतर अखेर प्रत्यक्षात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू झाली. मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याच पार्श्वभूमीवर समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

नाशिक, नगर जिल्ह्यातील गंगापूर, गोदावरी-दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे धरणातून हे पाणी सोडले जाणार आहे. या धरणांतून हळूहळू विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची प्रक्रिया अशीच सुरू राहणार असून, या माध्यमातून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र, प्रत्यक्षात ५ टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात येणार आहे.

विविध धरणांतून या प्रमाणात सुटणार पाणी
शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून २.१०, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून ३.३६, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी) ०.५, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी असे एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.

३५ टक्के पाणी वाया जाणार
नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांतून ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार एवढे पाणी सोडण्यात येणार असले, तरी यातील जवळपास ३५ टक्के पाणी वाया जाणार आहे. मात्र, एवढे पाणी वाया गेले, तरी भीषण स्थितीत मराठवाड्यातील काही दुष्काळी भागाची तहान भागण्यास सोडलेल्या पाण्याची मदत होणार आहे.

जायकवाडीचा पाणी साठा ४५ टक्क्यांवर!
नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणांतून सोडलेल्या पाण्यापेकी ५ टीएमसी पाणी जरी मिळाले, तरी या पाण्यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४४ ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळी भागाला दिलासा मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR