धुळे : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेत बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे बँकेत गोंधळ सुरू आहे. हे सरकार मिस मॅनेजमेंटचे सरकार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेत गफला झाल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्रीच म्हणत आहेत, तर याची चौकशी ईडी, सीबीआयकडून करावी अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. या संदर्भात सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, या सरकारकडून मला काहीही अपेक्षा नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आलेले हे सरकार आहे. सरकार स्थापनेसाठी त्यांनी घर, पक्ष फोडण्याचा प्रकार केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पोटातले ओठात येत आहे. आम्हाला सत्ता द्या लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू, असे ते सांगत आहेत. आम्ही कधीही अशी भाषा वापरलेली नाही. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे सांगायला काहीही नाही. महिन्याला पंधराशे रुपये देऊन मते विकत घेण्याचा कार्यक्रम सरकारने केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे चुकीचे फॉर्म भरले असतील तर ती सरकारची चूक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अशी चूक झाल्याची कबुली दिली आहे. लाडकी बहीण योजनेत गफला झाल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्रीच म्हणत आहेत, तर याची चौकशी ईडी, सीबीआयकडून करावी, असे पत्र मला केंद्र सरकारला लिहावे लागणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
योजनेमुळे बँकांमध्ये गोंधळ
लाडकी बहीण योजनेत बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे बँकेत गोंधळ सुरू आहे. हे सरकार मिस मॅनेजमेंटचे सरकार आहे. या सरकारकडून मला काहीही अपेक्षा नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आलेले हे सरकार आहे. सरकार स्थापनेसाठी त्यांनी घर, पक्ष फोडण्याचा प्रकार केला आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून पक्ष फोडण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.