25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्याउप-जिल्हाधिका-यांवरच पोलिसांनी केला लाठीचार्ज

उप-जिल्हाधिका-यांवरच पोलिसांनी केला लाठीचार्ज

‘भारत बंद’ला उत्तर भारतात हिंसक वळण

पाटणा : वृत्तसंस्था
आज (बुधवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. बिहारमधील काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांकडून चक्क उपजिल्हाधिका-यांवरच लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी, उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसावर चांगलेच संतापल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटीझन्स पोलिसांना ट्रोल करत आहेत.

अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमीलेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच, २१ ऑगस्ट रोजी १४ तासांसाठी भारत बंदची हाक दिली. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशन नावाच्या संघटनेनं सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

दरम्यान, या भारत बंदमध्ये सहभागी होत काही संघटनांनी केलेल्या आंदोलनास बिहारच्या पाटणा येथे हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. पाटणामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यावेळी उपजिल्हाधिका-यांसह पोलीस व इतर पोलिस फोर्स रस्त्यावर उतरला होता. मात्र, यावेळी, पोलीस फोर्समधील एका पोलिसाने चक्क उपजिल्हाधिका-यावरच लाठीचार्ज केल्याची घटना घडली.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. राज्यांना एससी आणि एसटी गटांमध्ये उप-वर्गीकरण करण्याची परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामागे सर्वाधिक गरजू लोकांना आरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR