कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापुरात महायुतीच्या विरोधात अज्ञातांनी मिरजकर तिकटी येथे पोस्टरबाजी केली आहे. ‘कोल्हापूरचा विकास खुंटवणा-या सरकारचे कोल्हापुरात सहर्ष स्वागत’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा सन्मान मेळावा आज गुरुवारी तपोवन मैदान येथे पार पडत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कोल्हापूरकरांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचे उपहासात्मक स्वागत करत निषेध व्यक्त केला आहे. मिरजकर तिकटी येथे लावण्यात आलेल्या पोस्टरवरून पोलिस आणि नागरिकांमध्ये शाब्दिक वादावादीचा प्रकार घडला.
महायुतीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर झळकल्याने या पोस्टरची चर्चा शहरात सुरू आहे. तर कागलचे पालकमंत्री असे पोस्टरवर लिहीत हसन मुश्रीफ यांना देखील टोला लगावला आहे.
पोस्टरवर कोल्हापुरात खोळंबलेल्या विकासकामाचा उल्लेख करण्यात आला आहे. शहर हद्दवाढ, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, केशवराव भोसले नाट्यगृह आगीचे कारण, शाहू मिल पुनरुज्जीवन, महापालिका निवडणूक, पंचगंगा प्रदूषण, रस्त्यांची दुरवस्था, यासह रखडलेल्या कामांची यादी या पोस्टरवर लिहिण्यात आली आहे.