पुणे : प्रतिनिधी
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्याने पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे.
त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. आंदोलनस्थळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भेट देऊन आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती. तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करीत सरकारला अल्टिमेटम दिला होता. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वत: आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असा इशारा शरद पवारांनी दिला होता.