वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासंदर्भात माहिती दिली. त्यांना आता स्पेसएक्स रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याच माध्यमातून त्यांना परत आणणे अतिशय जोखीमचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर यांचे हे वर्ष आता अंतराळ स्थानकातच जाणार आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळ यानातून ते पृथ्वीवर परत येऊ शकतात. हे यान पुढील महिन्यात अंतराळस्थानकाकडे झेपावणार आहे. या अंतराळ यानात चार सीट आहेत. त्यातील दोन सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी रिकामी ठेवली जाणार आहेत. तसेच स्टारलाइनर विना चालक दल अंतराळ स्थानकातून वेगळा होणार आहे. अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परतणार आहे.
स्पेसएक्सला बोइंगचा सर्वात मोठा स्पर्धेक मानले जाते. परंतु बोइंगच्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सची निवड नासाने केली. २०१६ मध्ये बोइंगने स्टारलाइनर विकसित केले होते. त्यासाठी १.६ बिलियन डॉलर खर्च लागण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च लागला आहे.
नेल्सन यांनी ूस्टनमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते की, बोईंगचे नवीन सीईओ केली ऑर्टबर्ग यांच्याशी चर्चा केली. स्टारलाइनर सुरक्षितपणे परत आल्यावर त्यातील तांत्रिक बिघाडावर काम करण्याचे त्यांनी सांगितले आहे. बोईंग देखील त्यांच्या सर्वात महत्वाच्या उत्पादनांच्या, व्यावसायिक विमानांच्या उत्पादनात गुणवत्तेबाबत संघर्ष करत आहे.