रायपूर : राहुल गांधी छत्तीसगड दौ-याच्या दुस-या दिवशी सकाळी नवा रायपूरजवळील काथिया गावात पोहोचले. येथे ते हातात विळा आणि डोक्यावर गमछा बांधून शेतक-यांसह राबताना दिसले. राहुल गांधींनी शेतात भात कापणी केली.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक पोस्टदेखील केली आहे. ज्यामध्ये राहुल गांधी आणि गृहमंत्री ताम्रध्वज साहू हातात धानाचे पीक घेतलेले दिसत आहेत. त्याचवेळी राहुल यांनी छत्तीसगडमधील शेतक-यांसाठी काँग्रेस सरकारच्या ५ सर्वोत्तम कामांची यादी सांगितली आहे. राहुल गांधी म्हणतात की, हे छत्तीसगडचे मॉडेल आहे. ज्याची संपूर्ण देशात पुनरावृत्ती केली जाईल. राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव, विधानसभा अध्यक्ष चरणदास महंत आणि गृहमंत्री ताम्रध्वज साहू हेही उपस्थित होते. राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या योजनांबाबत शेतक-यांशी चर्चा केली.
पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांसाठी राहुल गांधी प्रचार करत आहेत. आज राजनांदगाव येथील मेळाव्याला संबोधित केले. यानंतर दुसरी सभा कावर्धा येथे होणार आहे. राजनांदगाव हा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. रमण सिंह यांचा मतदारसंघ असल्याने हा हायप्रोफाईल जागा मानली जाते. शनिवारी पहिल्याच दिवशी छत्तीसगडमध्ये पोहोचलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बस्तरमध्ये दोन मोठ्या सभा घेतल्या. राहुल यांनी प्रथम उत्तर बस्तरच्या भानुप्रतापपूर मतदारसंघात आणि नंतर कोंडागावच्या फरासगावमध्ये सर्वसाधारण सभेला संबोधित केले. काँग्रेस गरिबांसाठी काम करते, मात्र भाजप गरिबांचा पैसा अदानींना देत असल्याचे राहुल म्हणाले. गरिबाच्या मुलाने इंग्रजी बोलू नये असे भाजप नेत्यांना वाटते.
भानुप्रतापपूरमध्ये २ मोठ्या घोषणा
या मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधींनी दोन मोठ्या घोषणा केल्या. ते म्हणाले की, सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. कोणतेही प्रवेश शुल्क किंवा शिक्षण शुल्क भरावे लागणार नाही. ते म्हणाले की, तेंदूपत्ता तोडणा-यांसाठी आम्ही मोठे वचन देत आहोत. दरवर्षी त्या कुटुंबांना प्रोत्साहन म्हणून चार हजार रुपये दिले जातील.