नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या कळवण येथील दुर्गम भागात असणा-या लिंगामा गावाजवळ असणा-या एका विहिरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना आढळून आले. ही घटना उघडकीस येताक्षणी एकच खळबळ उडाली.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांमध्ये घडणारे गुन्हे आणि त्यामुळे सातत्याने माणुसकीला लागणारा काळिमा हे सर्व चित्र काही केल्या सुधारण्याचे नाव घेत नाही.
मयत मुलींची ओळख पटली असून, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्याचे म्हटले जात आहे. तपासातून प्राथमिक स्वरूपात समोर आलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुली २५ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या.
तेव्हापासूनच कुटुंबीयांनी या मुलींचा शोध सुरू केला होता. २६ ऑगस्ट रोजी लिंगामे गावातील एका गृहस्थांना या मुलींचे मृतदेह आढळले. सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आता ही आत्महत्या आहे की घातपात याविषयीचा शोध घेण्याचे काम पोलिस यंत्रणेने हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.