23.4 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्रमी महाराष्ट्राची माफी मागतो

मी महाराष्ट्राची माफी मागतो

पुतळा प्रकरणी अजित पवारांची स्पष्ट भूमिका

मुंबई : प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. विरोधकांनीही महायुती सरकारला धारेवर धरले मात्र या सगळ्या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे.

दरम्यान, नौदल दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते मात्र सोमवारी दुपारच्या सुमारास हा पुतळा अचानक कोसळला.

दुसरीकडे वा-यामुळे हा पुतळा कोसळल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर पुतळा कोसळ्याच्या घटनेप्रकरणी अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. मी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागतो, असे अजित पवार यांनी जाहीर सभेत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रा अहमदपूर येथे आली असताना त्यांनी माफी मागितली.

दोन दिवसांपूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा वा-यामुळे कोसळला. त्यासंदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी केली जाणार आहे. ते कुणी केले त्याचा तपास लागला पाहिजे. त्यासंदर्भात राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी याबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्या दैवताचा पुतळा वर्षाच्या आत कोसळणे हे सगळ्यांना धक्का देणारे आहे. काम करणा-या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकले पाहिजे. आपल्या इथे कायदे नरम आहेत, असे अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR