26.2 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeउद्योगभारतीय क्रिकेटच्या प्रक्षेपणामध्ये रिलायन्सचे राज्य

भारतीय क्रिकेटच्या प्रक्षेपणामध्ये रिलायन्सचे राज्य

डिज्नी स्टार आणि वायकॉम १८ चे डील पक्के

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांना गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमांवर क्रिकेट सामने पाहायला मिळत आहेत. म्हणजे कधी हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स, कधी जिओ सिनेमावर, स्पोर्ट्स १८ वर. पण आता एकाच ठिकाणी सामने पाहाता येऊ शकतात.

यामागील कारण असे की कॉम्पेटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) रिलायन्स इंडस्ट्रीज लि. समूहाचा भाग असलेल्या ‘वायकॉम १८’चा मनोरंजन व्यवसाय आणि वॉल्ट डिस्रे कंपनीच्या मालकीच्या स्टार इंडिया प्रा. लि. यांच्या विलगीकरणाला परवानगी दिली आहे. या विलगीकरणामुळे भारतीय मीडिया क्षेत्रात मोठा परिणाम होताना दिसणार आहे. मनोरंजन क्षेत्रातील दोन मोठे पॉवर हाऊस एकत्र येत असल्याने देशातील एक मोठा मीडिया समूह तयार होईल.

खरंतर फेब्रुवारी २०२४ मध्येच यांचं विलगीकरण होणार असल्याची चर्चा होती. कारण रिलायन्स इंडस्ट्री, वायाकॉम १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वॉल्ट डिज्नी या कंपन्यांचे करार निश्चित झाले होते. न्यायालयाने मंजूर केलेल्या व्यवस्थेच्या योजनेअंतर्गत वायाकॉम १८ स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विलीन करण्यात येणार आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबई खंडपीठाने मे २०२४ मध्ये विलनीकरणाच्या योजनेला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर हा निर्णय झाला आहे.

यात रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड वायाकॉम१८ व त्यांची उपकंपनी डिजिटल १८ आणि वॉल्ट डिज्नीची स्टार इंडिया या कंपन्यांच्या विलीनीकरण योजनेला मंजुरी देण्यात आली होती. याबाबत सीसीआयने एक्सवर (आधीचे ट्वीटर) पोस्ट शेअर केली आहे. या विलगीकरणामुळे आता सातत्याने बदलणा-या मीडिया इंडिस्ट्रीमध्ये आपला पाया भक्कम रोवण्यासाठी दोन्ही कंपन्यांना फायदा मिळणार आहे.

अमेरिकेतील द वॉल्ट डिस्रे कंपनीच्या संपूर्ण मालकीची कंपनी असलेली स्टार इंडिया टीव्ही प्रसारण, मोशन पिक्चर्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या व्यवसायासह प्रसार माध्यमांमधील घडामोडींमध्ये सक्रिय आहे, तर वायकॉम १८ भारतात आणि जगभरात दूरचित्रवाणी (टीव्ही) चॅनेलचे प्रसारण, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या व्यवसायात गुंतलेली असून चित्रपट निर्मिती आणि वितरणाच्या व्यवसायातदेखील ती गुंतलेली आहे. आता त्यांच्या विलगीकरणामुळे अनेक भाषांमधील १०० हून अधिक चॅनेल, दोन आघाडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि देशभरातील ७५ कोटी प्रेक्षकसंख्येसह, भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी तयार होणार आहे.

क्रीडा क्षेत्राला फायदा कसा?
गेल्या काही वर्षात अनेक क्रीडा स्पर्धा चाहत्यांनी डिज्नी स्टार मालकीच्या स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहिल्यात, तर काही स्पर्धा वायकॉम १८ मालकीच्या जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स १८ चॅनेलवर पाहिल्या आहेत. भारतातील क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क वायकॉम१८कडे आहेत, तर आयसीसी स्पर्धांच्या प्रक्षेपणाचे हक्क डिज्नी स्टारकडे आहेत. पण आता या दोन्ही कंपन्या एकत्र येत असल्याने याचा फायदा क्रीडा क्षेत्रालाही मिळणार आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात या दोन्ही कंपन्यांची ताकदही आणखी वाढणार आहे. इतकेच नाही, तर मनोरंजन क्षेत्रातही या दोन्ही कंपन्यांना फायदा मिळू शकतो. त्यांच्याकडे असणारे कंटेट वाढणार आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन सारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मशीही स्पर्धा करण्यासाठी मोठी ताकद मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR