लातूर : प्रतिनिधी
लातूर, धाराशीव आणि बीड या तीन जिल्ह्यातील जीवनवाहिणी असलेल्या मांजरा नदीचा उगम असलेल्या पाटोदा महसूल मंडळात दुस-यांदा अतिवृष्टी झाली असून त्यामुळे मांजरा धरणात ११२.६२९ दशलक्ष घनमीटर एवढा एकुण पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यात ब-यापैकी वाढ झाली असून धरणात ३७.०१ टक्के पाणीसाठा आहे.
पाटोदा महसूल मंडळात शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी ७८ मिली मीटर पाऊस झाला होता. मांजरा धरण क्षेत्रातही मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे मांजरा धरणात पाण्याच यवा वाढला आहे. रविवारी सकाळी ६ वाजता मांजरा धरणात २७ टक्के पाणीसाठा होता. त्यात दुपारी १२ वाजेपर्यंत झपाट्याने वाढ होऊन ३० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा गेला आहे. सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत हा पाणीसाठा ३३.२० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या १५ दिवसांत पाटोदा महसुल मंडळात दुस-यांदा अतिवृष्टी झाली. त्याचा फायदा मांजरा धरणाला झाला आहे. मांजरा धरणात आणखी आवक सुरुच आहे. मांजरा धरणावरील अप्पर प्रकल्पाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. गतवर्षी मांजरा प्रकल्पात आज रोजी ४४.२० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता.
म्हणजेच २४.९ टक्के जिवंत पाणीसाठा होता. २६ ऑगस्ट २०२३ रोजी मांजरा धरणात एकुण पाणीसाठा ९९.३३ दशलक्ष घनमीटर होता. मांजरा धरणाात २८ ऑगस्ट २०२४ रोजी एकुण पाणीसाठा ११२.६२९ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. जिवंत पाणीसाठा ६५.४९९ दशलक्ष घनमीटर आहे. तर जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ३७.०१ एवढी आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ७ टक्के अधिकचा पाणीसाठा मांजरा धरणात सद्य:स्थित आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी शेतीला पाणी मिळणे आवश्यक आहे. दोन-तीन दिवस असाच पाऊस पडता तर धरण ७०-८० टक्क्यांपर्यंत जाऊन शेतीलाही पाणी मिळणे शक्य होईल. शेतीला पाणी मिळेल, अशी खात्री वाटत असल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.