23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयसोलापुरातून लवकरच विमानसेवा

सोलापुरातून लवकरच विमानसेवा

तिरुपतीसह प्रमुख शहरांसाठी विमानाची सोय उपलब्ध होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मराठवाड्यासह २ राज्यांच्या जवळचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या सोलापूर विमानतळावरून लवकरच हवाई वाहतूक सुरू होणार आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेला डीजीसीए परवाना आणि तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले. हवाई वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक असलेली कामे विमानतळावर युद्धपातळीवर सुरू असून सोलापूरकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दरम्यान, सोलापुरातून लवकरच थेट तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सोलापूर विमानतळाबाबतच्या विविध विषयांसंदर्भात नवी दिल्लीत मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली, त्यावेळी हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सुरेश, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, डॉ. शरद कुमार यांच्यासह अक्सा आणि इंडिगो कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘उडान-आरसीएसच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलापूर विमानतळासाठी ५० कोटींची विविध विकासकामे झाली आहेत. शिवाय सोलापूर विमानतळासाठी आवश्यक असणा-या मनुष्यबळाचे प्रशिक्षण सुरु असून ते लवकरच सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘डीजीसीए’ (नागरी विमानन महानिदेशालय)च्या परवान्यासाठी आणि तांत्रिक बाबींच्या लवकरात लवकर पूर्ततेसाठी अधिका-यांना सूचना केल्या आहेत, असे सांगितले.

विमान कंपन्यांशीही बोलणीला सुरुवात
सोलापूरहून देशाच्या विविध ठिकाणी जाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतला असून सोलापूर-तिरुपती, सोलापूर-दिल्ली, सोलापूर-हैदराबाद या सेवा सुरू करण्याबाबत विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत सकारात्मक चर्चा केली असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR